बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

समृद्ध वारसा


चारी दिशांनी रस्ते जिथे येऊन मिळतात त्या दमदम्यावर वर पाच मिनिट बस, बघ तुला ओळखीचे, जिव्हाळ्याचे चेहरे दिसतील, त्यांना भेट, चार शब्द बोल...मोलाचे होतील.

तिथून पश्चिमेला दरज्यातुन चालत रहा, डाव्या बाजूला थोडं पुढे गेल्यावर जिथे तू पहिली ते चौथी शिकला ती तुझी कौलांची शाळा दिसेल, शाळेसमोरच्या पिंपळाच्या पानांची सळसळ ऐक, शाळेपाठीमागचा गुलमोहर तुला खूणवत राहील, शाळेत तुला तू तिथे शोधत असतानाच त्याच्या पुढेच गावदेवीच्या देवळातून घंटानाद ऐकू येईल, तिकडे चालत रहा, मंदिराच्या बाजूला असलेली तुझी खेळण्याची जागा बघ तिथे तुला विट्टी दांडुच रिंगण,गोट्याचं खळग पडलेलं दिसेल, तिथून चार पायऱ्या उतर, उजव्या बाजूला संतोषी मातेच छोटं मंदिर असेल घुडग्यावर वाकून मंदिरात जा, प्रणाम कर, आशीर्वाद घे, बाहेर आल्यावर समोर जलकुंड असेल, त्यात पाणी कुठून येत ह्याच विचारात मंदिरात प्रवेश कर, आई इंदाई च दर्शन घे, गाभाऱ्याला एक चक्कर मारून बाहेर निघ, मंदिराला फिरून वरच्या बाजूला जुन्या दगडी मंदिराकडे चालत रहा, सभामंडपात येऊन उभा रहा तिथले नक्षीदार दगडी खांब बघ,  ते बघत बघत गाभाऱ्यात जा तिथलं शिवपिंड आणि नंदी सातआठशे वर्षांपासून गावावर लक्ष ठेवून असतील, तिथलं वातावरण तुझ्यासाठी लाखमोलाचं असेल,

बाहेर निघुन आडव्या दगडी खांबाला दगडाने वाजवून पहा, भांड्यांसारखा आवाज येईल, तो आवाज अंतर्मनात जतन करून ठेव, तिथूनच समोर दगडावरून उडी मार तलावाच्या पायऱ्यांवर उतर, खाली उतरून पाण्यात पाय बुडवून बस, त्या कोमट पाण्याचा स्पर्श तुला आल्हाददायी वाटेल, तिथे बसून दगडी मंदिराचा आणि तलावाचा इतिहास आठवु नको, डोक्याला मुंग्या येतील. तिथे थोडा वेळ बसून झाल्यावर, मंदिराच्या वरच्या बाजूने बाहेर निघ, समोर जुनी प्राथमिक शाळा असेल, तिच्या प्रशस्त ओट्यावर बसलेले जुने खोडं बघत बघत पाराकडे ये, त्या उंच पारावर गावाचा मेढ्या शेंदुरलेला मारुती उभा असेल, त्याला नमस्कार कर, त्याच्या भोवती एक चक्कर मारून त्याच्या मागच्या बाजूला उभा राहून बघ, समोर शाळा, गुलमोहर, काळदेवीचं दगडी मंदिर, इंदाई देवीचं मंदिर, तू जिथे उभा आहे तो मारुतीचा पार आणि ह्या सर्वांच्या मधोमध असलेला तलाव हा सारा भवताल तुला समृद्ध करत असेल.


-जयंत देसले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा