बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

समृद्ध वारसा


चारी दिशांनी रस्ते जिथे येऊन मिळतात त्या दमदम्यावर वर पाच मिनिट बस, बघ तुला ओळखीचे, जिव्हाळ्याचे चेहरे दिसतील, त्यांना भेट, चार शब्द बोल...मोलाचे होतील.

तिथून पश्चिमेला दरज्यातुन चालत रहा, डाव्या बाजूला थोडं पुढे गेल्यावर जिथे तू पहिली ते चौथी शिकला ती तुझी कौलांची शाळा दिसेल, शाळेसमोरच्या पिंपळाच्या पानांची सळसळ ऐक, शाळेपाठीमागचा गुलमोहर तुला खूणवत राहील, शाळेत तुला तू तिथे शोधत असतानाच त्याच्या पुढेच गावदेवीच्या देवळातून घंटानाद ऐकू येईल, तिकडे चालत रहा, मंदिराच्या बाजूला असलेली तुझी खेळण्याची जागा बघ तिथे तुला विट्टी दांडुच रिंगण,गोट्याचं खळग पडलेलं दिसेल, तिथून चार पायऱ्या उतर, उजव्या बाजूला संतोषी मातेच छोटं मंदिर असेल घुडग्यावर वाकून मंदिरात जा, प्रणाम कर, आशीर्वाद घे, बाहेर आल्यावर समोर जलकुंड असेल, त्यात पाणी कुठून येत ह्याच विचारात मंदिरात प्रवेश कर, आई इंदाई च दर्शन घे, गाभाऱ्याला एक चक्कर मारून बाहेर निघ, मंदिराला फिरून वरच्या बाजूला जुन्या दगडी मंदिराकडे चालत रहा, सभामंडपात येऊन उभा रहा तिथले नक्षीदार दगडी खांब बघ,  ते बघत बघत गाभाऱ्यात जा तिथलं शिवपिंड आणि नंदी सातआठशे वर्षांपासून गावावर लक्ष ठेवून असतील, तिथलं वातावरण तुझ्यासाठी लाखमोलाचं असेल,

बाहेर निघुन आडव्या दगडी खांबाला दगडाने वाजवून पहा, भांड्यांसारखा आवाज येईल, तो आवाज अंतर्मनात जतन करून ठेव, तिथूनच समोर दगडावरून उडी मार तलावाच्या पायऱ्यांवर उतर, खाली उतरून पाण्यात पाय बुडवून बस, त्या कोमट पाण्याचा स्पर्श तुला आल्हाददायी वाटेल, तिथे बसून दगडी मंदिराचा आणि तलावाचा इतिहास आठवु नको, डोक्याला मुंग्या येतील. तिथे थोडा वेळ बसून झाल्यावर, मंदिराच्या वरच्या बाजूने बाहेर निघ, समोर जुनी प्राथमिक शाळा असेल, तिच्या प्रशस्त ओट्यावर बसलेले जुने खोडं बघत बघत पाराकडे ये, त्या उंच पारावर गावाचा मेढ्या शेंदुरलेला मारुती उभा असेल, त्याला नमस्कार कर, त्याच्या भोवती एक चक्कर मारून त्याच्या मागच्या बाजूला उभा राहून बघ, समोर शाळा, गुलमोहर, काळदेवीचं दगडी मंदिर, इंदाई देवीचं मंदिर, तू जिथे उभा आहे तो मारुतीचा पार आणि ह्या सर्वांच्या मधोमध असलेला तलाव हा सारा भवताल तुला समृद्ध करत असेल.


-जयंत देसले.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

गांव

गांव हे एक झाडं आहे,
तिथेही माणुसरुपी पक्षी राहतात..
आपल्यासारखे काही पक्षी तिथे जन्म घेऊन मोठे होतात,
आणि कळायला लागल्यावर अन्न पाण्यासाठी
दुर जातात.
तर काही तिथेच जन्मतात आणि त्या झाडाच्या सहवासातच आपले आयुष्य व्यतीत करतात, तिथेच मरतात ही.
झाडासारखेच गावंही तिथे राहत असलेल्या पक्षांवर जिवापाड प्रेम करत,
पण दुर गेलेल्या पक्षांचीही परत येण्याची वाट पाहत असते,
त्यालाही ओढ असते आपल्या अंगा खांद्यावर खेळलेल्या पक्षांची.
गांव असतं झांडांप्रमाणेच ...
आपल्यांच्या आठवणीत अबोल ...
तसच स्थिर..
पण आतुन गलबललेल.

#जयंत.
फोटो- इंटरनेटवरुन साभार.

चिऊताई

प्रिय चिऊताई...

विषय: जागतिक चिमणीदिनाच्या तुला शुभेच्छा देण्याबाबत.....

तर प्रिय चिऊ,
      वरील विषयान्वये तुला जागतिक चिमणीदिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
     
        म्हणशील स्वत:शीच की कोण हा मला शुभेच्छा देणारा....
 तु ओळखणार नाहीस मला,
      पण मी तुला लहानपणापासुन ओळखतो,
 अगदी जस मला कळायला लागल्यापासुन तुझ्या नावाचे घास खायचो,
 तु दिसलीस तरच जेवायचो....
 आई म्हणायची हा घास चिऊताईचा....
लहानपणी एकलेल्या तुझ्या चिऊताई चिऊताई दार उघड पासुन आपली ओळख,
 तुला पण तेवढच ताईपण दिल जेव्हढं माझ्या मोठ्या ताईला दिलं,
 तुम्हा दोघांनंतर अजुन एक ताई ती म्हणजे खारुताई,
 पण आज दिवस तुझा म्हणुन विषय फक्त तुझाच असेल.
 मी आज पण माझ्या लहान भाचींना चिमण्याच म्हणतो,
 आहेतच तुझ्या सारख्या गोंडस,
 हो गं....
 तु किती सुंदर दिसते माहीत आहे तुला,
 मस्त मुठीच्या आकाराची,
 लाल-तपकिरी-करड्या रंगाची,
 ती येवढिशी चोच....
 अजुन ही चिमणी म्हटलं की तुझं ते सुंदर चित्र डोळ्यासमोर येत गं,
  पण आता तु काही पहिल्यासारखी भेटत नाही गं,
  चुक आमचीच आहे मानव जातीची,
  आम्ही खुप स्वार्थी झालोय गं,
  जास्त उत्पन्न मिळवण्याच्या नादापायी रासायनीक गोष्टींचा वापर केलाय त्यामुळे तुझे जीवन धोक्यात घातलंय आम्ही,
  माफी मागतो मी सर्वांकडुन तुझी,
  कधी कधी दिसते कुठेतरी तारांवर बसलेली,
  लहानपणी धान्य वाळत टाकायचो,
  तेव्हा मीच असयाचो ते सांभाळायला,
  तु आलीस की मी हाकलुन लावायचो,
  त्याची आज पण लाज वाटते गं मला,
  तेव्हा मला कुठे कळायचं,
  की त्यात तुमचा पण हिस्सा असतो ते,
  पण आता नाही करणार तसं,
 असो तसं लिहिण्यासारख खुप आहे पण आता,
  जास्त काही लिहित नाही,

तुला पुन्हा चिमणीदिनाच्या खुप खुप शुभेच्छा!



                                                     तुझाच
                                                  एक बालमित्र.







फोटो- इंटरनेटवरुन संग्रहित.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

महादेव मंदिर(काळी देव मंदिर)

महादेव मंदिर(काळी देवाचे मंदिर)
ओळख – 
संत भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आपल्या येथील इतिहासाची साक्ष देतात. उन, वारा, पाऊस आणि परकीय आक्रमणे सोसत हिंदू  संस्कृतीचा वारसा जपणारी हि वास्तू शिल्पे त्या काळातील आपल्या पूर्वजांच्या हर हुन्नरी पणाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. धुळे आणि नाशिक जिल्हा तर अशा मंदिराच्या अस्तित्वानेच पावन झाला आहे. यातील काही मंदिरांमुळे धुळे आणि  नाशिकचे नाव सातासमुद्रापलिकडे पोहचले आहे. धुळे जिल्ह्यातील इंदवे गावातील महादेव मंदिर  हेमाडपंथीय मंदिर त्या  पैकीच एक आहे.



इतिहास -  
भारतीय स्थापत्य शैलीपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमांद्री पंडित किंवा हेमांड पंथ यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उद्योग केल्याने ही बांधणी पद्धत त्याच्या नावावरून हेमाडपंथी म्हणून ओळखले जाऊ लागले.  धुळे आणि नाशिक  मध्ये देखील त्या काळात या राजाचे शासन असल्याने महादेव  मंदिर बांधण्यात आले. मंदिराचे हेमाडपंथी पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिल्याने ते आजही अभ्यासकाना उपलब्ध आहे. सामान्यत: इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यानाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना हेमांडपंथी रचनांमध्ये केली जाते. औंढा नागनाथ तसेच झोडगे चे मंदिर ही स्थापत्य शैली चे काही उदाहरण आहेत.
यादवकालीन हेमांड पंथी मंदिरे हि महाराष्ट्राला मिळालेली एक अपूर्व देणगीच आहे. भव्य, दिव्य, अप्रतिम कलाकुसर व काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती आणि मंदिर ही त्यांची वैशिष्ट्य म्हणता येईल. डोंदाईचा शहरापासून २१ किमी अंतरावर असणारया इंदवे गावात  वसलेले काळी देवाचे(महादेवाचे) अतिप्राचीन मंदिर अंदाजे १३ व्या शतकात  बांधले आहे. महादेव मंदिर किंवा काळी देवाचे मंदिर  म्हणून या मंदिरा ओळखले जाते.मध्ययुगीन  काळात बांधलेले हे मंदिर आहे. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे.



मंदिराच्या गाभार्‍यात शिवपिंड आणि नंदी ची सुबक मूर्ती आहे.  सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून  त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देव-देवता कोरलेले आहेत. 
 


                     -जयंत.