बुधवार, १५ जुलै, २०२६

गाव

अशी कधीतरी मध्यरात्री जाग येते मला. काही कारण नसतांना, तहानही लागलेली नसते, कसलं स्वप्नही पडत नसतं. तरी डोळे उघडतात. मी छताकडे बघत पडून राहतो. पंखा फिरत असतो, विचार त्याच्यापेक्षा जास्त वेगाने फिरत असतात.
मला नेहमी प्रश्न पडतो, मी नक्की कोणत्या काळात जगतोय?
म्हणजे शरीर इथे आजच्या दिवसात. 
पण मन...? 
ते अजूनही गावातच फिरतय. शाळेजवळ, दगडी मंदिराजवळ, तलावाच्या पायऱ्यांवर, लिंबाच्या सावलीत, कधी दमदम्यावर मित्रांसोबत, कधी शाळेत, वर्गाच्या खिडकीतून बाहेर बघत.
कधी कधी वाटतं आपण मोठे झालोय ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केलीय, पण आपल्या मनाने अजून मान्य केलेली नाही.
लोक म्हणतात आठवणींत जगू नये.
पण आठवणींत जगतो कोण?
आठवणीच आपल्यात जगत असतात.
जुन्या वहीचा वास आला की अचानक शाळा समोर उभी राहते. 
जुनं गाणं ऐकलं, की कुणाचा तरी चेहरा आठवतो. 
हिवाळ्यात शेकोटीच्या गप्पा. 
पावसाळ्यात चिखलाच्या पायवाटा.
माणूस इतक्या छोट्या छोट्या गोष्टी का जपून ठेवतो?
त्याला माणसं जपता येत नाहीत म्हणून.
काही लोक निघून जातात, काही भेटणं बंद करतात, काही कायमचे हरवतात.
पण त्यांच्याशी जोडलेले क्षण थोडीच हरवतात.
ते तर आपल्याच आत राहतात.
मला अजूनही काही माणसं वर्तमानकाळात आठवत नाहीत, ती नेहमी भूतकाळातच भेटतात, तेव्हा जशी होती तशीच. त्यांच तेच हसणं, तेच बोलणं, त्याच वयातलं.
बहुतेक म्हणूनच मी जुन्या गोष्टी इतक्या लिहितो.
तुम्हाला काय वाटतं मी कथा लिहितो?
खरं तर मी हे जपतो.
माणसं,शाळा, मित्र मैत्रीण, झाडं, मंदिर, तलाव, दगडी पायरी,शेत शिवार,नदी,नाला, सण उत्सव, सर्व सर्व आठवतं.
बाकी आयुष्यात मिळवलं काय, गमावलं काय, हा हिशोब मला कधी जमला नाही.
पण एवढं मात्र खरं...
जग पुढे निघून गेलं असलं, तरी माझ्या मनात अजून तेच गाव आहे.
तिथं अजूनही शाळा भरते....
तलावात अजूनही गरम पाणीय....
तिथली माणसं...
हे सर्व अजूनही तिथंच आहेत.
माझी वाट बघत. 
कदाचित मी त्यांची.

@जयंत 

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

वीरगळ

युध्‍दात असो, गावच्‍या रक्षण करताना देश धर्मासाठी, प्राण्यांच्या रक्षणासाठी ज्‍या पुरूषांनी आपल्‍या प्राणाची आहुती दिली, त्‍यांना वीर पुरूष या नावाने ओळखले जाऊ लागले. अशाच वीरपुरूषांनी दिलेल्‍या आत्मबलिदानाच्‍या स्‍मरणार्थ राजाकडून,गावकरी,किंवा कुटुंबाकडून त्या वीरपुरूषांची स्‍मारके उभारली गेली त्‍यानांच वीरगळ असे म्‍हणतात, 

वीरगळ मध्ये दोन प्रकार असतात,
एक आयुताकृती दगडाची पाटी सारखी आणि दुसरी चारी बाजूनी कोरलेली,
चौकोनी दगडाच्या वीरगळ इंदवे ह्या गावात आहेत.

समोरील बाजूला युद्धप्रसंगात वीर जमिनीवर ढाल तलवारीने लढताना मरण पावलाय.

मागच्या बाजूला वीराला स्‍वर्गप्राप्‍ती होते व त्‍यास स्‍वर्गात घेऊन जाताना वीराच्‍या दोन्‍ही बाजूला अप्सरा आहेत.


डाव्या बाजूला वीराला शिवपिंड पुजन करताना त्‍याला मोक्ष प्राप्त मिळते.


उजव्या बाजूला चंद्र व सुर्य कोरलेला असतो याचा अर्थ असा की चंद्र व सुर्याप्रमाणे या वीराची किर्ती अजरामर राहो,,,

वीरगळच्‍या सर्वात वरील भागात कलश कोरलेला असतो.
अशा प्रकारे वीरगळच वाचन केलं जातं.

(इथे चार ते पाच वीरगळ असून, एकात व्यक्तीसोबत समोरासमोर युद्ध खेळताना आलेलं वीरमरण आहे, आणि दोन गळ घोड्यावर बसून युद्ध खेळताना आलेलं विरमरण ह्यावर आहेत)

ह्या वीरगळ जीर्ण झाल्या असून, त्या जतन करणं गरजेचं आहे)

-जयंत देसले.

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

समृद्ध शाळा...

शाळा शिकत असताना, इमारत, वर्गखोल्या, फळ्यावरील सुविचार, बाक, त्यावर कोरलेली नावं, दप्तरं, पुस्तकं, वह्या, धडे कविता, वर्गात घडलेले क्षण, पटांगण, झाडं, शाळेचा भवताल... हे सारं त्यावेळेस नेणीवेत जसं साठवून ठेवलं गेलं, तसंच ते शाळा सुटल्यावरही आठवणींच्या धूसर पण जिवंत चित्रफितीसारखं डोळ्यासमोर उभं राहतं.
दोन मजली इमारत, मध्यभागी रंगमंच, कार्यालय, वर्ग, वरांडा, चौकोनी वर्गखोल्या, खालून पुसट होत गेलेला पांढरट रंगाच्या भिंती, कोळीच्या जाळ्यांचे कोपरे, आणि समोरच्या भिंतीला मधोमध असलेला काळा रंगाचा फळा. फळ्याच्या वरती दररोज नवीन सुविचार.
फळ्यासमोर तोंड करून लाकडी बाकांच्या चार ओळी.
डावी कडच्या दोन ओळींवर मुलं, उजवीकडच्या दोन ओळींवर मुली, अशी बैठक व्यवस्था.
अनेक हातांनी खरडलेले. पेन, पेन्सिल, कर्कटक ने कोरलेली नावानी नक्षीकाम असलेले बाक,
बाकाच्या खाली दप्तर ठेवायला असलेली पाटी लावलेला कप्पा. दप्तरं जड वाटायची, पण त्यात काय असायचं? पुस्तकं, वह्या,एक-दोन पेन, पेन्सिली, रबर, शार्पनर, पट्टी आणि एका कप्प्यात ठेवलेला जेवणाचा डब्बा.
आणि शाळेचं पटांगण... तिथे तर सारे ऋतू उतरायचे. उन्हाळ्यात धुळीचे लोट उडायचे, पावसात मातीचा सुगंध दरवळायचा, हिवाळ्यात सकाळी त्या मैदानात थंडीने दात कुडकुडायचे. त्या पटांगणात लिंबाचे, निलगिरीचे, अशोकाचे दाट झाडं होते. त्या झाडांच्या सावलीत डब्बे खायचो, खेळ खेळायचो.
शाळा म्हणजे एक जिवंत वास्तू होती  जिथे आपण मोठे होत गेलो, जिथे नकळत आपल्या आतलं लहान मूल जपलं गेलं. आणि आज, वर्षानुवर्षांनीही, त्या वर्गखोल्यांची भिंत,फळा ,बाक, पटांगण, झाडं अन तिथला सारा भवताल अजूनही मनात खोल आपली ओळख घेऊन टपून बसलाय.

-जयंत देसले.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

महादेव मंदिर(काळी देव मंदिर)

महादेव मंदिर(काळी देवाचे मंदिर)
ओळख – 
संत भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आपल्या येथील इतिहासाची साक्ष देतात. उन, वारा, पाऊस आणि परकीय आक्रमणे सोसत हिंदू  संस्कृतीचा वारसा जपणारी हि वास्तू शिल्पे त्या काळातील आपल्या पूर्वजांच्या हर हुन्नरी पणाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. धुळे आणि नाशिक जिल्हा तर अशा मंदिराच्या अस्तित्वानेच पावन झाला आहे. यातील काही मंदिरांमुळे धुळे आणि  नाशिकचे नाव सातासमुद्रापलिकडे पोहचले आहे. धुळे जिल्ह्यातील इंदवे गावातील महादेव मंदिर  हेमाडपंथीय मंदिर त्या  पैकीच एक आहे.



इतिहास -  
भारतीय स्थापत्य शैलीपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंथी शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमांद्री पंडित किंवा हेमांड पंथ यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उद्योग केल्याने ही बांधणी पद्धत त्याच्या नावावरून हेमाडपंथी म्हणून ओळखले जाऊ लागले.  धुळे आणि नाशिक  मध्ये देखील त्या काळात या राजाचे शासन असल्याने महादेव  मंदिर बांधण्यात आले. मंदिराचे हेमाडपंथी पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिल्याने ते आजही अभ्यासकाना उपलब्ध आहे. सामान्यत: इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यानाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना हेमांडपंथी रचनांमध्ये केली जाते. औंढा नागनाथ तसेच झोडगे चे मंदिर ही स्थापत्य शैली चे काही उदाहरण आहेत.
यादवकालीन हेमांड पंथी मंदिरे हि महाराष्ट्राला मिळालेली एक अपूर्व देणगीच आहे. भव्य, दिव्य, अप्रतिम कलाकुसर व काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती आणि मंदिर ही त्यांची वैशिष्ट्य म्हणता येईल. डोंदाईचा शहरापासून २१ किमी अंतरावर असणारया इंदवे गावात  वसलेले काळी देवाचे(महादेवाचे) अतिप्राचीन मंदिर अंदाजे १३ व्या शतकात  बांधले आहे. महादेव मंदिर किंवा काळी देवाचे मंदिर  म्हणून या मंदिरा ओळखले जाते.मध्ययुगीन  काळात बांधलेले हे मंदिर आहे. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे.



मंदिराच्या गाभार्‍यात शिवपिंड आणि नंदी ची सुबक मूर्ती आहे.  सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून  त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देव-देवता कोरलेले आहेत. 
 


                     -जयंत.